निरक्षर अबलेला वेदान्त समजून सांगण्यासाठी हा ग्रंथ रचिला गेला, यावरून तो किती सुगम असावा याची कल्पना येईल. प्रत्येक प्रकरणातील पूर्वरंगात अध्यात्म परिणामी अशी एक कथा व उत्तररंगात त्या कथेतील वेदान्ताचे विशदीकरण सोप्या पण प्रासादिक भाषेत केलेले आहे. या ग्रंथात हंसमंडळाला उपलब्ध झालेली आठ प्रकरणं समाविष्ट केली आहेत. बाकीची दहा प्रकरणे प्रयत्न करूनही मिळालेली नाहीत.
१
२
श्री संकेत कुबडी
दासबोधाच्या प्रत्येक दशकाचा एकेका समासात सारांश देऊन त्यातील समासात २-४ ओव्यात सार सांगणारा हा ग्रंथ वैशिष्टयपूर्ण असून त्यातील मार्मिक विधाने हंसराज स्वामींच्या सूक्ष्म निरीक्षण, अचूक मूल्यमापन या गुणांचे दर्शन घडवितात. दासबोधाचे वेदान्तकेन्द्री व्यवस्थापन या ग्रंथात केले आहे. ओवीसंख्या फक्त ६२० एवढीच आहे. त्यांच्यासोबत त्यांचा गद्यानुवादही दिला आहे.
आगमसार
वेदान्त शास्त्राची प्रक्रिया सुलभतेने व थोडक्यात समजून घ्यावयाची असेल तर हा ग्रंथ अवश्य वाचावा. निरनिराळ्या पारिभाषिक संज्ञांचे स्पष्टीकरण आणि व्याख्या हंसराज स्वामी अतिशय सोप्या करून सांगतात. समर्थ रामदास स्वामीकृत श्री ग्रंथराज दासबोधातील वेदान्ताचे रहस्य समजण्यास हा ग्रंथ फार उपयोगी ठरेल. हंसराज स्वामी श्री. रामदासी परंपरेचे असून 'शाब्दे च परे च निष्णात' असे स्वानुभवी असून या ग्रंथात वेदान्ताच्या शास्त्रीय मांडणीबरोबर त्यातील आत्मप्रतीतीचाही रंग अपूर्व आहे. या ग्रंथात १४ पंचिका असून एकूण ओवीसंख्या ३५२६ आहे.
३
४
लघुवाक्यवृत्ती
श्रीमदादयशंकराचार्याच्या लघुवाक्यवृत्ती या अठरा श्लोकांच्या प्रकरणावर हंसराज स्वामींची ही ५६०० ऒव्यांची टीका आहे. उपनिषदांतील प्रसिद्ध महावाक्यांपैकी 'अहं ब्रह्यास्मि' या महावाक्याला केंद्रस्थानी ठेवून स्वामींनी एवढा हा ग्रंथविस्तार केला आहे. त्यासाठी पूर्वार्धात ब्रह्यात्मैक्याचे ज्ञान म्हणजे काय हे सांगून सर्व ज्ञानप्रक्रिया स्पष्ट केली आहे. उत्तरार्धात हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी कोणकोणते अभ्यास करायचे असतात, ते स्पष्ट केले आहे. या ग्रंथातील ही अभ्यासमीमांसा खूप प्रसिद्ध असून प्रा. न. र. फाटक, श्री. श्रीपादशास्त्री किंजवडेकर इ. नी तिची खूपच प्रशंसा केली आहे. हा ग्रंथ विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात खूप प्रसिद्ध होता. गोंधळेकर, आवटे इ. प्रकाशकांनी त्याच्या तीन तीन आवृत्त्या काढल्या होत्या. या ग्रंथाचा १९१८ मध्ये गुजरातीतही अनुवाद झाला होता. हंस मंडळाने आता जी आवृत्ती प्रसिद्ध केली आहे तिच्यात मूळ संहितेबरोबर तिचा गद्यानुवादही प्रसिद्ध केला आहे.
सदाचार
श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या 'सदाचार' याच नावाच्या लघु प्रकरणावर हंसराज स्वामींनी ही टीका लिहिली आहे. पांगरी येथील काशिनाथबाबा दीक्षित यांच्यासाठी त्यांनी हा ग्रंथाची रचना केली होती. त्यात प्रामुख्याने ब्रम्हात्मैक्याचाच सिद्धांत सांगितलेला आहे. आचार्यांच्या मूळ प्रकरणात एकूण ५४ श्लोक असून स्वामींनी त्यांचा २०६४ ओव्यांमध्ये विस्तार केला आहे. या ग्रंथाचे स्थूलमानाने दोन भाग आहेत. एक ते पंधरा श्लोकात ज्ञानी पुरुषांचा आचार म्हणजे सदाचार कसा असतो याचे वर्णन केले आहे. हंसराज स्वामींची या भागावरील टीका ८६४ ओव्यांची आहे. या भागातील विषयावरूनच या ग्रंथाला 'सदाचार' हे नाव दिले गेले आहे असे दिसते. नंतरच्या १६ ते ५४ श्लोकांमध्ये अधात्ममार्गाची साधने, आत्मानात्मविवेक, ब्रह्य, माया, जीव, जगत इ. विषयांचे स्वरूप स्पष्ट करून ब्रह्मात्मैक्य कसे साध्य करावे याचे मार्गदर्शन केले आहे. सामान्य मुमुक्षूच्या पातळीवर आचाराचे स्वरूप कसे असते, साधकाच्या पातळीवर ते कसे असते आणि सिद्धाच्या भूमिकेवरून ते कसे असते याचे सुंदर विवेचन या ग्रंथात आढळते. गुरुशिष्यांच्या संवादाच्या रूपाने ग्रंथाची मांडणी केल्यामुळे तिच्यात मानवी भावना, नाट्यात्मकता, गुरुशिष्यांचा परस्परांबद्दल प्रेमभाव इ. चे मनोज्ञ दर्शन घडते म्हणून हा ग्रंथ ही वाचकांना आवडलेला अहे. निर्णयसागरने त्याच्या आठ आवृत्या काढलेल्या आहेत त्याचाही १९१८ च्या सुमारास गुजराती भाषेत अनुवाद झालेला आहे. प्रस्तुत हंस मंडळाच्या आवृत्तीत मूळ संहितेचा गद्यानुवादही जोडलेला अहे.
५
६
सटीक अमृतानुभव
हा ग्रंथ हंसराजस्वामींनी ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव या ग्रंथावर केलेली समच्छंदी समसंख्य टीका आहे. मूळ अमृतानुभवाचे दहा अध्याय असून त्यात एकूण ८०५ ओव्या आहेत. हंसराजस्वामींनी प्रत्येक अध्यायाच्या आरंभी त्यातील विषयाची कल्पना देणारी एक अधिकची ओवी घातली आहे. अमृतानुभवावरील अशा प्रकारचा हा पहिलाच ग्रंथ असावा. ज्ञानेश्वरीची किंवा अमृतानुभवाची ५५० वर्षापूर्वीची भाषा चटकन समजत नाही. म्हणून हंसराजस्वामींनी स्वतःच्या काळातील भाषेमध्ये हा ग्रंथ ओवीबद्ध अनुवाद केला आहे. त्यामुळे हंसराजस्वामींची ही टीका अमृतानुभव समजण्यास उपयोगी पडेल. ही टीका प्रथम १८९५ मध्ये प्रकाशित झाली होती. ती मिळेनाशी झाल्यामुळे जवळ जवळ एकशेवीस वर्षांनी नव्या स्वरूपात प्रसिद्ध झाली आहे.
वेदेश्वरी
हंसराजस्वामींच्या सर्व ग्रंथात विस्ताराने मोठा व तितकाच महत्त्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वामींनी सन १८४७ मध्ये लिहिला. हा ग्रंथ म्हणजे शिवगीतेवरची स्वामींची ही विस्तीर्ण टीका आहे. शिवगीतेमध्ये १६ अध्याय असून एकूण ७९३ श्लोक आहेत आणि त्यावरच्या त्यावरच्या या टीकेत एकूण ९२३८ ओव्या आहेत. हंसराजस्वामींचे काव्यातील नाव 'वेद' असे आहे. त्यावरून या टीकेला वेदेश्वरी असे नाव दिले आहे. या टीकेचे ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीशी बरेच साम्य आहे. असे असले तरी हंसराजस्वामीचे वैशिष्टय ठरलेला वेदान्त प्रतिपादन हाच या ग्रंथाचा विषय आहे. तथापि शिवगीतेत ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग या सर्व मार्गांचा वेदान्ताच्या पार्श्वभूमीवर समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवगीतेच्या उपलब्ध संस्कृत आणि मराठी टीकांमध्ये हंसराजस्वामींची ही टीका सर्वात विस्तृत असून स्वतंत्र दृष्टिकोन प्रकट करणारी आहे. वेदान्ताच्या उत्तम, मध्यम, आणि मंद अशा तिन्ही प्रकारच्या अधिकाऱ्यांना समोर ठेवून स्वामींनी ही सर्वसुलभ टीका लिहिलेली आहे. हा ग्रंथ यशवंत प्रकाशन, पुणे यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
७
८
चूडालाख्यान
हंसराजस्वामींनी लिहिलेले हे एक सुंदर आख्यानक काव्य आहे. हे आख्यान काव्यायोगवासिष्ठातील निर्वाण प्रकरणातील चूडालोपाख्यान याच नावाच्या कथेवर आधारलेले आहे. मराठीतील आध्यात्मिक काव्यांपैकी हे उत्कृष्ट आख्यान काव्य आहे. एका ज्ञानी स्त्रीने आपल्या पतीला ज्ञानाची गोडी लावून त्याला ज्ञानसंपन्न कसे केले याची हृद्य कहाणी या काव्यात आहे. हंसराज स्वामींनी काव्याला मराठीचा साज चढवताना आपली कवित्वशक्ती पणाला लावली आहे. त्या दृष्टीने मूळ कथानकातील नको असलेले भाग गाळून या कथेला अधिक रमणीय केले आहे. आवृत्ती ४थी (१९९२) हा ग्रंथ रामचरित मानस मंडळ, परांडा या संस्थेने प्रसिद्ध केला आहे
वेदाज्ञा
हंसराजस्वामींनी ईशावास्योपनिषद या उपनिषदावर लिहिलेली ही टीका आहे. तिला त्यांनी वेदाज्ञा असे नाव दिले आहे. ही टीका म्हणजे वेदांची आज्ञाच आहे आणि 'वेद' हे हंसराजस्वामींचे टोपण नाव आहे, हे लक्षात घेता ही वेदाज्ञा म्हणजे हंसराजस्वामींचा हा उपदेशच आहे असाही त्याचा अर्थ निघतो. मूळ ईशावास्योपनिषदात १८ मंत्र आहेत. त्यांचा त्यांनी आपल्या या टीकेत ४० श्लोक आणि ५०१ ओव्या अशा ५४१ छंद प्रकारात विस्तार केला आहे. त्यांचा या टीकेचा रंग सर्वमान्य टीकांपेक्षा वेगळा आहे. मूळ उपनिषदात कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय करण्याचा प्रयत्न दिसतो. हंसराजस्वामींच्या टीकेत उपनिषदांपेक्षा त्यांना वेगळे सांगायचे आहे ते स्पष्ट होते. मूळ उपनिषदात ज्ञान, कर्म यांचा समुच्चय सांगण्याचा प्रयत्न आहे, तर स्वामींच्या या टीकेत वेदान्ती भूमिकेतून ज्ञानपर अर्थ लावण्याचा प्रयत्न आहे तो निश्चितच वाचण्यालायक आहे. उपनिषदाच्या अभ्यासकांनी तो जरूर वाचावा.
९
१०
पद्यसंग्रह
हंसराजस्वामींनी वेळोवेळी वेदान्त विषयावार पद्यरचना केली आहे. त्यांच्या चरित्रकारांनी (हंसपद्धतिकारांनी) केलेल्या उल्लेखावरून ती पदे हजाराच्या आसपास असावीत. पण आम्हांला फक्त ८९ पद्ये असलेली एक छोटीशी पुस्तिका मिळाली. ती केव्हा छापली गेली हे कळले नाही. पण ' वेद ' मुद्रेमुळे ती पदे हंसराजस्वामींची आहेत हे सिद्ध होते. पदे गेय आहेत . सर्व पदे वेदांन्तपरच आहेत. त्यांच्या अर्थासह ती येथे येथे नव्याने प्रसिद्ध होत आहेत. वेदान्त सोपा करून सांगण्याची कला येथेही दिसून येते.
पूर्वारंभगाथा
समर्थ रामदासांनी साठ ओव्यांचे एक छोटेसे पण गोड प्रकरण लिहिले आहे . त्या प्रकरणावर हंसराजस्वामींनीची गद्य टीका आहे. एकोणिसाव्या शतकातील मराठी भाषेचे स्वरूप या गद्य टीकेवरून समजते. समर्थकृत पूर्वारंभात गुरुशिष्यांच्या प्रश्नोत्तरांच्या मांडणीतून वेदांन्ताचे निरूपण आहे. हंसराजस्वामी वेदांन्तप्रेमी असल्यामुळे त्यांनी या ग्रंथाची टीकेसाठी निवड केली, हे स्पष्ट आहे. ही प्रतिपद टीका नसून मूळ ग्रंथाच्या आधारे हंसराजस्वामींनी केलेली ही वेदांन्ताची स्वतंत्र मांडणी आहे. पूर्वारंभाविषयी लिहिताना समर्थभक्त श्री.शं .श्री. देवांनी पुढील अभिप्राय दिला आहे. " शहाण्याने हे प्रकरण खरोखरच वाचू नये. त्याला त्याला वेड लागावयाचे. आपण मरेपर्यंत शहाणेच राहावे व त्या शहाणपणातच मरावे असे ज्यास वाटत असेल त्याने या प्रकरणाच्या वाट्याला जाऊ नये. " हंसराजस्वामींच्या या टीकेला हाच अभिप्राय लागू पडतो. ' शहाण्यास अधिक सांगणे न लगे. ' हा ग्रंथ डॉ . ग. वा. करंदीकरांनी संपादित केला आहे. तो हंसमंडळाकडे उपलब्ध आहे. हंसराजस्वामींच्या गद्यात लिहिलेला तत्त्वझाडा हा ग्रंथ लवकरच प्रथमच प्रसिद्ध होत आहे. तसेच त्यांच्या समर्थ ते हंसराज या परंपरेतील सात पुरूषांची चरित्रे सांगणारा ' हंसपद्धती ' हा ग्रंथही हंसभक्तांच्या सेवेत रूजू करण्याची इच्छा आहे.
११
Newsletter
Videos
Google Map
Copyrights @2021. All rights reserved | Website designed & developed by Ashtech