हल्ली हंसराज स्वामींचे सर्वच ग्रंथ दुर्मिळ झाल्यामुळे हंस मंडळा(परंडा)ने त्यांचे उपलब्ध सर्व ग्रंथ पुनर्मुद्रित करण्याचा संकल्प सोडला. सन २००६ पासून हे पुनर्मुद्रणाचे कार्य चालू झालं आहे. आतापर्यत कथाकल्पलता, संकेत कुबडी, आगमसार, लघुवाक्यवृत्ती आणि सदाचार हे ग्रंथ हंस मंडळातर्फे प्रकाशित झाले आहेत. त्यांचे संपादन डॉ. कल्याण काळे यांनी केले आहे. चूडालाख्यान, पूर्वारंभगाथा, वेदेश्वरी, अमृतानुभव या ग्रंथांना डॉ. कल्याण काळे यांच्या प्रस्तावना आहेत. पद्यसंग्रह आणि वेदाज्ञा हे ग्रंथ लवकरच प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या प्रस्तावना डॉ. कल्याण काळे यांच्या आहेत. त्यांचा चूडालाख्यान हा ग्रंथ परंड्याच्या रामचरित मानसप्रेमी मंडळ या संस्थेने प्रकाशित केला आहे, तर पूर्वारंभ गाथा हा ग्रंथ पुण्याचे डॉ. ग. वा. करंदीकर यांनी प्रसिद्ध केला आहे. पुण्याच्या यशवंत प्रकाशनाने त्यांच्या वेदेश्वरी हा ग्रंथ पुनर्मुद्रित केला आहे. हे सर्व ग्रंथ सध्या उपलब्ध आहेत. आता हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. त्याच्या प्रकाशनाची जबाबदारी चेतक बुक्स, पुणे या संस्थेने घेतलेली आहे. याखेरीज तत्वझाडा आणि हंसपध्दती हे ग्रंथ आणि हंसपध्दती प्रकाशित व्हायचे राहिले आहेत तेही लवकरच प्रसिद्ध करण्याचा हंसमंडळाचा मानस आहे.
हंसराज स्वामींचे हे सर्व ग्रंथ वेदान्तावरचे आहेत. वेदान्ताखेरीज आपण काही लिहिणार नाही, अशी त्यांची प्रतिज्ञाच होती. संस्कृतातील गहन वेदान्त स्वामींनी सुबोध करून मराठीत आणला. वेदान्तपर ग्रंथात ज्ञानप्रक्रिया आणि अभ्यासप्रक्रिया असे दोन विभाग त्यांनी हेतुतःच पाडलेले आहेत. ज्ञानप्रक्रियेस ब्रम्ह, माया, जीव, जगत, जगद्रुत्पत्ती, शरीराच्या जागृत्यादी अवस्था, पिंड ब्रम्हांडाची एकरूपता इ. विषय ते अगदी सोपे करून सांगतात. दुसऱ्या भागात ब्रम्हलैक्य साधण्यासाठी कराव्या लागणाऱ्या निरनिराळ्या अभ्यासांची माहिती त्यांनी दिलेली असते. ही माहिती इतकी महत्त्वाची असते की, ती मराठीत इतरत्र सहसा आढळत नाही. हंसराज स्वामींचे हे तत्त्वज्ञान मराठी संत वाड्मयाला दिलेले मोठे योगदानच समजायचे.
- डॉ. कल्याण काळे
दि. ३०. ६. २०१४
ए-५, प्रज्ञानगड,
नवश्या मारुती गल्ली, वीटभट्टी,
सिंहगड रस्ता, पुणे ४११ ०३०
फोन ०२०-२४२५३१३६